जगातील सर्वात मोठे ५ देश

जगात १९५ देश आहेत. काही देश इतके छोटे आहेत कि त्यांच्यासमोर तुमचं गावसुद्धा मोठं वाटावं. तर काही देश इतके भले मोठे आहेत, कि त्यांचा विस्तार बघून एवढा मोठा देश कसा एकसंध राहत असेल असा प्रश्न पडावा. जेवढा मोठा देश तेवढी देशाची लोकसंख्या जास्त, पर्यायानं विविधता जास्त. आम्ही घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठ्या पाच देशांबद्दल अशी रोचक माहिती. जी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 

जगातील सर्वात मोठे ५ देश


५) ब्राझील :

सुरुवात करूया पाचव्या क्रमांकाच्या देशापासून. ८५ लाख १५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेला ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश  आहे, तर क्षेत्रफळाचा विचार करता त्याचा जगात पाचवा क्रमांक लागतो. तसेच सुमारे १९ कोटी २३ लाख लोकसंख्येसह या बाबतीत देखील त्याचा जगात पाचवा क्रमांक लागतो. पाऊ ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून या देशाचे नाव पडले आहे. ब्राझिलिया हि या देशाची राजधानी असून साओ पाउलो हे सर्वात मोठे शहर आहे. पूर्वी या देशावर पोर्तुगालचे राज्य होते. नन्तर हा देश पोर्तुगालपासून स्वतंत्र झाला असला तरी देशाची अधिकृत भाषा आजही पोर्तुगीज हीच आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था जगातील आठव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या देशांपैकी ब्राझील हा एक देश आहे. भविष्यातील महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलचे नाव घेतले जाते. अमेझॉन जंगलाचा सुमारे ६०% भाग ब्राझील या देशात आहे. या देशात एक असे बेट आहे जिथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही. कारण या बेटावर पावलागणिक साप आहेत. त्यामुळे त्या बेटाचे नावच स्नेक आयलंड अर्थात सापांचे बेट आहे. या देशातील रिओ दि जानेरो येथे असलेला ख्राईस्ट द रिडीमर या येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याचा जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश केला जातो. कार्निव्हल हा येथील जगप्रसिद्ध उत्सव असून तो पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येतात. 


४) अमेरिका :

आता येऊया चौथ्या क्रमांकाच्या देशाकडे. हा देश जगातील आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. रणरणत्या वाळवंटापासून बर्फाच्छादित प्रदेश तसेच उजाड डोंगरी प्रदेशापासून ते जगप्रसिद्ध धबधबे अशी भौगोलिक विविधता या देशाला लाभली आहे. हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे क्षेत्र या देशातच कॅलिफोर्निया राज्यात आहे. बरोबर ओळखलंत. सुमारे ९६ लाख ३१ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह अमेरिका हा जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. याचे अधिकृत नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असून वॉशिंग्टन डी. सी. हि राजधानी आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे ३४ कोटी असून या बाबतीत हा जगातील तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका या देशात ५० राज्ये असून प्रत्येक राज्याचे स्वतःचे सरकार व कायदेव्यवस्था आहे. हा देश अत्यंत पुढारलेला असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाला मागे टाकणारा हा देश आहे. या देशात श्रीमंतांची संख्या खूप जास्त असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही भक्कम आहे. या देशाचे चलन डॉलर असून त्याला जगभरात मान आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठे लष्कर असल्याने हा देश लष्करीदृष्ट्या सर्वाधिक बलशाली आहे. अण्वस्त्रे बनवून त्यांचा युद्धात वापर करणारा हा पहिला व एकमेव देश आहे.


३) चीन :

जगातील सर्वात मोठ्या देशांच्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असे या देशाचे अधिकृत नाव आहे. बीजिंग हि या देशाची राजधानी आहे. या देशाचे क्षेत्रफळ ९६ लाख चौरस किलोमीटर असून आकारासोबतच लोकसंख्येच्या बाबतीतही चीन जगात आघाडीवर आहे. सुमारे १ अब्ज ४२ लाख लोकसंख्येसह चीन जगात प्रथम क्रमांकावर होता. काही दिवसांपूर्वीच भारताने या बाबतीत चीनवर मात केली. चीनच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ९१% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. माणूस सोडून इतर बहुतेक सर्व प्रकारचे सजीव या देशात खाल्ले जातात. आर्थिक बाबतीत हा देश अग्रेसर असून या देशाचे लष्करी सामर्थ्यदेखील  अचाट आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हा देश पुढारलेला असला तरी इथे इंटरनेट वापरावर अनेक बंधने आहेत. हा देश नवी महासत्ता म्हणून उदयाला येत असून  जगावर सत्ता गाजवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. भारताशी अनेक बाबतीत या देशाचे वाद असले तरी चायनीज फूड आणि चायनीज वस्तू आपल्या लोकांना फार आवडतात.


२) कॅनडा :

क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे कॅनडा. उत्तर अमेरिका खंडातील हा सर्वात मोठा देश आहे. या देशात भारतीयांची संख्या जास्त आहे आणि त्यात पंजाबी लोकांचा समावेश लक्षणीय आहे. सुमारे ९९.८ लाख वर्ग किलोमीटर एवढे या देशाचे क्षेत्रफळ असून ओट्टावा हे राजधानीचे शहर आहे. एवढा मोठा देश असूनही या देशाची सीमा फक्त अमेरिकेसोबत आहे आणि ती जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमारेषा असून तिची लांबी सुमारे ८९०० किलोमीटर इतकी आहे. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा हा या सीमारेषेवर असून पर्यटकांचे हे प्रमुख आकर्षण आहे. या देशाचा सुमारे ४०% भाग वनक्षेत्राच्या व्यापलेला असून इथे नैसर्गिक झऱ्यांचे प्रमाणही खूप आहे. पृथ्वीवरील सुमारे २०% शुद्ध पाणी इथल्या झऱ्यांच्या आढळते असे म्हणतात. तुम्हाला माहित नसेल, पण कच्या तेलाच्या साठ्याच्या बाबतीत सौदी अरेबिया व व्हेनेझ्युएला यानंतर कॅनडाचा तिसरा क्रमांक लागतो. कॅनडा हा विकसित देश असल्याने इथे वास्तव्य करणे खूप लोकांचे स्वप्न असते. या देशाचे चलन कॅनेडियन डॉलर असून त्याची किंमत भारतीय रुपयांपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळेच कि काय पण भारतीयांना कॅनडाचे खूप आकर्षण वाटते. एका रिपोर्टनुसार दरवर्षी तीस हजाराहून जास्त भारतीय कॅनडाला येतात. 


१) रशिया :

काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठा देश होता सोविएत युनियन. १९९१ मध्ये या देशाचे विभाजन होऊन तब्बल १५ देशांची निर्मिती झाली. या १५ पैकीच एक देश म्हणजे रशिया. आज रशिया हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. मॉस्को हि या देशाची राजधानी. आर्थिक तसेच लष्करी शक्तीच्या बाबतीत देखील हा देश आघाडीवर आहे. या देशाचा विस्तार आशिया तसेच युरोप अशा दोन खंडांत झालेला आहे. याचा पूर्व भाग आशिया खंडात येतो, तर पश्चिम भाग युरोप खंडात. या देशाचे क्षेत्रफळ १ कोटी ७० लाख ९८ हजार दोनशे बेचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे. त्यापैकी १ कोटी ६३ लाख ७६ हजार आठशे सत्तर भाग जमिनीचा असून फक्त ७ लाख २० हजार पाचशे किलोमीटर भाग जलक्षेत्र आहे. आकाराच्या मानाने या देशाची लोकसंख्या फारच कमी म्हणजे फक्त १४ कोटी ३० लाख एवढी आहे, आणि तीसुद्धा जास्त करून पश्चिम भागात एकवटलेली आहे. या देशात वोडकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. वोड म्हणजे पाणी आणि त्याला का लावून झाले पाण्यासारखे पेय. आणि इथले लोक वोडका पाण्यासारखी पितात. तुम्हाला माहित असेलच कि अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारीन हे देखील रशियाचेच. रशिया भारताचा मित्र देश असून संरक्षण विषयक अनेक हत्यारे तसेच लढाऊ विमाने आपण रशियाकडून आयात करतो. 

Previous Post Next Post